याचसाठी हा अट्टाहास...



आम्हा घरी धन | शब्दांचीच रत्ने
शब्दांचीच शस्त्रे | यत्न करू ||
शब्दची आमुच्या | जिवाचे जीवनं
शब्दे वाटू धन | जनलोका ||

व्यासपीठाच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या वक्तृत्ववेड्या तरूणांच्या शब्दप्रेमाच्या कथा लिहायच्या ठरवल्या तर विश्वातील एक आदर्श, स्तिमीत करणारा, सूख आणि दु:खाच्या मिश्रणातून बनलेला, नवरसांनी भारलेला असा देखणा ग्रंथ तयार होईल. नेमकी वर्षे नाही सांगता आली तरी जवळपास चाळीस ते पन्नास वर्षांपासून किंवा अधिक काळापासून महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा महाराष्ट्रातल्या विविध महाविद्यालयात आयोजित केल्या जातात. या स्पर्धांमधे सहभागी होण्यासाठी एक अलिखीत नियम आहे. ज्याच्या मनात लोकसेवेचा ओलावा आहे तोच व्यासपीठावरून निर्भीडपणे बोलू शकतो आणि असेच, समाजोध्दाराची तळमळ आणि लोकशिक्षणासाठी त्यागाची तयारी असणारे विद्यार्थी आजवर या स्पर्धांमधे सहभागी होत आले. काहींनी वयक्तीक आयुष्यात यशाची अनेक शिखरे सर केली तर काहींनी समाजसेवेचे व्रत घेतले. वक्तृत्व स्पर्धक असलेल्या प्रत्येकाला खूप चांगले, मोठे काम करता आलेच असे नाही. पण, त्यापैकी एकानेही वाईट काम केले नाही, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.

आज आपण वक्तृत्व आणि वक्त्यांविषयीच्या या संकेतस्थळाच्या माध्यमातून वक्तृत्व स्पर्धांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. माहिती मिळविण्यासाठी आणि ती महाराष्ट्राच्या विविध भागात लोकजागृतीचे काम करणा-या वक्त्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी या माध्यमाचा वापर करणार आहोत. संयोजकांना इथे स्पर्धकांचे संपर्क मिळतील आणि वक्त्यांना स्पर्धा समजतील. नव्या युगाने दिलेल्या संवादाच्या या प्रगत माध्यमाचा वापर वक्तृत्व स्पर्धक करत आहेत ही आनंदाची आणि आशादायक बाब आहे. बहुतांश संयोजकानी आपल्या या संकेतस्थळावर आपली स्पर्धा नोंदवावी. सर्व स्पर्धकांनी आपली नोंदणी करून आपले नाव वक्त्यांच्या यादीत कायमस्वरूपी नोंदले जाण्यासाठी सहकार्य करावे.

तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर स्पर्धा करणा-या सर्व स्पर्धकांना, परिक्षण करणा-या परिक्षकांना, माजी स्पर्धकांना, संयोजकांना एकच विनंती आहे - वक्तृत्व, काव्य, कथा हा आपल्या सर्वांना जोडणारा धागा आहे. वेगवेगळ्या भुमिकेत असलो तरी आपण एकाच माळेचे मणी आहोत. आपल्यापैकीच काही वक्तृत्ववेड्या मित्रांनी या संकेतस्थळाची निर्मीती केली आहे. त्याना आशा आहे की आपण टाकलेल्या पावलांमधे बळ भरण्यासाठी महाराष्ट्रभर पसरलेले आपल्या कुटूंबाचे सदस्य या संकेतस्थळावर दररोज येतील. जास्तीत जास्त लोकांपर्यंत याची माहिती घेउन जातील. आणि भविष्यात हे संकेतस्थळ महाराष्ट्रातल्या तमाम वक्त्यांसाठी एक हक्काच विश्रांतीस्थळ ठरेल. शेवटी सर्व वक्ते, कवी, कथाकारांच्या प्रेमाशिवाय या उपक्रमाला सोनेरी किनार लाभणार नाही म्हणून संत ज्ञानेश्वरांच्या भाषेत एवढीच विनंती...

हे सारस्वताचे गोड | तुम्ही लाविले जी झाड |
तरी आता अवधानामृते वाड | सिंपोनि किजे ||
धन्यवाद!!!

- हणमंत शिंदे








संवाद अंतरीचा...!!!


संवाद हि मानवाची आदिम भूक राहिलेली आहे. आणि हाच संवाद वक्तृत्व पूर्ण करते. आज महाराष्ट्रात वक्त्यांना , स्पर्धांना, आणि मानधनाला कमी नाही, पण हरवत काय आहे तर ते वक्तृत्व !!!
डोईवर टोप आणि पायात पैंजणे घालून कोणत्याही बाजारबसवीला सरस्वतीचे रूप देता येत नाही , अगदी त्याच पद्धतीने शब्दांचा टोप आणि कवितेची पैंजणे बसवून असंबद्ध बोलण्याला वक्तृत्व म्हणता येत नाही .
हि एक आंतरिक गोष्ट आहे. विचारांचे घोडे बुद्धीचे मैदान धावून भुसभूशीत करायला लागले कि त्याच मैदानात विचारांचे रोप उगवत असते ... हीच रोपे उगवावीत यासाठीचाच हा अट्टाहास ...
जगातील कितीही मोठा कलाकार असो, त्याच्या आयुष्यातील सर्वोच्च पुरस्कार मिळाल्यास त्याला याच वक्तृत्वाच्या आधारे आयुष्याचे संचित सांगावे लागते .... हाच वक्तृत्वाचा विजय ....
विकार पुरून विचारांचे वटवृक्ष उभे राहावे आणि संस्कारांच्या सावलीत येणाऱ्या अनेक पिढ्या सुस्कारा टाकाव्या , हाच या प्रपंचाचा हेतू......
बाकी काय , बोलिले लेकुरे, वेडेवाकुडे उत्तरे , करा क्षमा अपराध , महाराज तुम्ही सिद्ध ......

- सचिन जगताप.















Leave a Reply